मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे छत सोमवारी कोसळले. कोट्यवधी रुपये खर्चून नुतनीकरण करण्यात आलेल्या मंत्रालयाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे या घटनेमुळे ठसठशीतपणे समोर आले आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्याचे कार्यालय आहे. कार्यालयाचे जवळपास ५० फूट लांबीचे छत सोमवारी सकाळी कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून बांधकाम विभागाच्या सचिवांना या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी मंत्रालयातील कर्मचाऱयांनीही मंत्रालयातील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कुचकामी वातानुकूलित यंत्रणेमुळे कर्मचाऱ्यांना घामाच्या धारा सहन कराव्या लागत असून, श्वासोच्छवासालाही त्रास होऊ लागल्याचे याआधीच समोर आले होते. कर्मचाऱयांनी आवाज उठवून कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी मुख्य सचिवांकडे केली होती. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘युनिटी’ कपंनीच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली गेली. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचेच छत कोसळल्याने कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे तब्बल अडीचशे कोटींच्या पुढे गेलेले मंत्रालयाचे काम देण्यात आलेल्या ‘युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स’ या कंपनीवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
