उन्हामुळे अंगाची लाहीलाही होणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. शनिवारपासून मुंबईतील हवामान गार झालं आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये रात्रीपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडतो. रविवार कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना अचानक आलेल्या पावसामुळे नाहक त्रास झाला. परळ, दादर, कुर्ला, सायन, चेंबूर परिसरात पाऊस पडलाय. त्यामुळे आज घराबाहेर पडताना छत्री सोबत घ्यायला विसरु नका.
रविवारी मुंबईत कमाल आणि किमान तापमान 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस होतं. रविवारी सकाळी मुंबईच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शहरातील उष्ण आणि दमट वातावरणातून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आणि त्यांचा विकेंड मस्त झाला.
मुंबई, ठाण्यासह नाशिकजवळील अनेक भागात विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि नाशिकला यलो अर्लट जारी करण्यात आला. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून थोडासा दिसाला मिळाला आहे. मुंबईत 4 मेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मात्र पावसाची शक्यता कमी आहे.
आज मुंबईकरांची सकाळ अवकाळी पाऊस आणि इंद्रधनुष्याच्या स्वागताने झाली. आज रविवार असल्याने अनेक ऑफिसला सुट्टी असल्याने मुंबईकरांनी घरात राहून पावसाचा मस्त गरमा गरम चहा सोबत आनंद लुटला.
