आठवडी बाजारात भाजी विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा झाला बाजार समितीत संचालक; वाचा संघर्षमय प्रवास

अनेकजण एखाद्या क्षेत्रात यश मिळत नाही म्हणून परिस्थितीला दोष देतात. उलट काहीजण परिस्थितीशी दोन हात करत आहे त्या स्थितिचा सामना करतात आणि यशस्वी होतात. कष्ट करणाऱ्यासमोर नशीबही झुकत असं म्हणतात ते उगाच नाही. नुकतंच याचाच प्रत्यय बीडमधील एका तरुणाने सर्वांना दाखवून दिला. बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा बाजार समितीत संचालक झाला. परिस्थिती गरीब असूनही थांबून न राहता कष्टाने काहीतरी होण्याचं त्यानं स्वप्न पाहिलं आणि सत्यात उतरवलं. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि परिस्थितीची जाणीव असली की यशाच्या शिखराला गवसणी घालणे सोपे जाते हे धनंजय गुंदेकर या तरुणानं दाखवून दिलं.

शेतकऱ्याचा मुलगा झाला बाजार समितीत संचालक

बीड जिल्ह्यातला धनंजय गुंदेकर हा बाजार समितीत संचालक झालाय. या विजयानंतर धनंजय यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. विशेष म्हणजे बाजारसमितीचा प्रचार करत असताना एका बाजारात धनंजय आणि त्याचे वडील भाजीपाला विकत बसलेले आहेत. हा फोटो देखील सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. धनंजयचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे. धनंजयच्या अभ्यासू वृत्तीने स्वतःची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली. छोटेसे का होईना पण सामान्यांसाठी लढणारा उमदा युवक अशी छाप त्यानं पाडली.

धनंजय गुंदेकर यांचा प्रवास

मराठवाड्यातील धनंजय गुंदेकर यांचा अनोखा विजय झाला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शालेय जीवनापासूनच धनंजय गुंदेकर यांच्यात लोकचळवळीचे गुण होते. उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली, त्यातून बाहेर पडून काही राजकीय व्यक्तींकडे पीए म्हणूनही तो काही काळ राहिला. हे सगळं करताना त्याला त्याच्यातील धडपडणारा कार्यकर्ता स्वस्थ बसू देत नव्हता हेही तितकचं खरं आहे. २०१७ ला आंबेसावळी ग्रामपंचायतीत धनंजयने त्याचे पॅनल उभे केले. ते दणकून आपटले. त्या दिवसापासून तर त्याने शासकीय अन्यायाने पिचलेल्या जन माणसांसाठी स्वतःला झोकून दिले

२८ व्या वर्षी बाजार समितीत संचालक

धनंजय गुंदेकर यांच्याकडे असलेल्या लढाऊ बाण्यामुळे सर्व मित्र, सख्या सोबतींची फौज उभी राहिली. आज वयाच्या २८ व्या वर्षी धनंजय बीड बाजार समितीत संचालक म्हणून निवडून गेला आहे. बीड जिल्ह्यातून चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवे उमदे नेतृत्व उभे होतेय हे पाहून अनेकांना आनंद झाला. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जो संघर्ष तू रस्त्यावर केला, तसाच न्याय तू त्यांना देशील याची आम्हाला खात्री आहे. खूप आनंद झाला अशा पद्धतीचा मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *