रस्ते अपघातात जखमी झाल्याने मेंदू मृत झालेल्या १२ वर्षीय मुलाच्या पालकांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे तीनजणांचे प्राण वाचले आहेत. के. जे. सोमय्या रुग्णालयामधील हे पहिले तर, मुंबईतील या वर्षीचे १३ वे अवयवदान ठरले आहे.
रस्ते अपघातात १४ एप्रिल रोजी जखमी झालेल्या १२ वर्षीय मुलाला के. जे. सोमय्या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र अनेक प्रयत्नानंतरही तो शुद्धीत न आल्याने १८ एप्रिल रोजी त्याला मेंदू मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, पालकांना वास्तव स्वीकारणे कठीण होते. अवयवदानाबाबत कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. सुरुवातीला ते इच्छुक नव्हते. मात्र डॉक्टरांनी आणि अतिदक्षता पथकाने त्यांचे समुपदेशन केल्यानंतर अखेर २१ एप्रिल रोजी कुटुंबाने आपल्या लाडक्या मुलाचे अवयवदान करून त्याला जिवंत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.
कुटुंबाच्या संमतीनंतर, त्याचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दुसऱ्या दिवशी पहाटे यशस्वी शस्त्रक्रिया करून तीन वेगवेगळ्या रुग्णांना दान करण्यात आली.
आमच्या तरुण मुलाचा मृत्यू स्वीकारणे आमच्यासाठी खूप कठीण होते, परंतु डॉक्टरांनी केलेल्या समुपदेशनामुळे आम्ही त्याचे अवयवदान करण्याचा आणि इतरांना जीवनदान देण्याचा निर्णय घेतला. आमचा मुलगा त्याच्या मृत्यूनंतरही जिवंत राहू शकतो, याची आम्हाला कल्पना आल्याने आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतल्याची भावना मेंदू मृत मुलाच्या पालकांनी व्यक्त केली.
