येऊर परिसरामध्ये रात्रविहारास चाप; ‘या’ वेळेत असणार प्रवेशबंदी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वन विभाग सक्रिय झाला आहे. या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार येऊरमधील प्रवेश रात्री १० वाजल्यानंतर बंद केला जाणार असून ठाण्यात परतण्यासाठी रात्री ११ वाजल्यानंतर प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. यामुळे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत येऊरमध्ये होणारी ये-जा थांबणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भातील आदेश देण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

ठाण्याला पश्चिमेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लाभले असून या उद्यानात अनेक वन्यप्राणी, पक्षी आणि आदिवासींचा वावर आहे. मात्र हळूहळू येथे अतिक्रमण होत असल्याने स्थानिक आदिवासींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या जंगल परिसरात रात्रभर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पार्ट्या, डीजेचा आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ, दारू व अमली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनधिकृत पार्किंग आदी उपद्रव वाढला आहे.

येऊर आदिवासी वनहक्क समितीच्या वतीने या विरोधात आक्रमक पाऊल उचलल्यानंतर वन खाते, ठाणे महापालिका अधिकारी यांची वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी बैठक आमंत्रित केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *