अनेकदा काही बातम्या वाचून हे कसं शक्य आहे असा प्रश्न नक्कीच पडतो. सध्या दक्षिण आफ्रिकेमधील अनेकांना असाच प्रश्न एका विमानाच्या आपत्कालीन लॅण्डींगवरुन पडला आहे. येथील एका वैमानिकाने विमानाचं आपत्कालीन लॅण्डींग करण्यामागील चमत्कारिक कारण समोर आलं आहे. रुडोल्फ इरास्मस असं या वैमानिकाचं नावं आहे. 11 हजार फुटांवर विमान उड्डाण करत असताना अचानक रुडोल्फ यांना पाठीला थंड गोष्टीचा स्पर्श झाल्याचं जाणवलं. त्यानंतर थोड्या वेळात त्यांना आपल्या पायलेट सीटच्या बाजूला चक्क एक कोब्रा साप दिसला. मात्र अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांचा जीव आपल्याच हाती असल्याचं भान ठेवत रुडोल्फ यांनी न घाबरता विमानाचं आपत्कालीन लॅण्डींग करण्याचा निर्णय घेतला. रुडॉल्फ यांनी यशस्वीपणे फ्लाइट उतरवलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. रुडॉल्फ यांच्यावर या कामगिरीसाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र हा साप इथं आलाच कसा याबद्दल संभ्रम कायम आहे.
बाटलीतून पाणी पडत असल्याची शंका आली अन्…
घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती रुडॉल्फनेच टाइमलाइन नावाच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिली. घडलेला संपूर्ण प्रकार फारच धक्कादायक होता. मागील 5 वर्षांपासून वैमानिक म्हणून काम करत असलेल्या रुडॉल्फला पहिल्यांदाच असा विचित्र अनुभव आला. वॉर्सेस्टरवरुन नेल्स्प्रूटला जणाऱ्या एका छोट्या विमानाचं सारथ्य रुडॉल्फ करत होता. या विमानामध्ये 4 प्रवासी प्रवास करत होते. पाठीला एखाद्या थंड गोष्टीचा स्पष्ट झाल्यासारखं रुडॉल्फला वाटलं तेव्हा वर ठेवलेल्या बाटलीमधून पाणी पडत असेल असा अंदाज त्याने व्यक्त केला. त्याने बाटली काढण्यासाठी हलचार केली तेव्हा रुडॉल्फटच्या सीटच्या बाजूलाच कोब्रा साप असल्याचं त्याला दिसलं.
साप सीटखाली असताना…
सापाला पाहिल्यानंतर नेमकं काय घडलंय हे रुडॉल्फला समजण्यासाठी काही क्षणांचा अवधी गेला. मात्र शांत राहण्याशिवाय रुडॉल्फकडे काहीही पर्याय नव्हता. त्यानेच घाबरुन आरडाओरड केला असता तर प्रवाशीही घाबरले असते. “ही गोष्ट प्रवाशांना सांगता कामा नये असं मला वाटलं. असं केलं असतं तर ते ही घाबरले असते आणि मला ते नको होतं,” असं रुडॉल्फ म्हणाले. साप सीटखाली बसलेला असतानाही रुडॉल्फने सावधपणे विमान चालवत ते लॅण्ड करण्याचा निर्णय घेतला.
…अन् तो साप गायब झाला
“विमान लॅण्ड केल्यानंतर मी बाहेर पडलो आणि सीटखाली पाहिलं तेव्हा मला सीटखाली मला 4 फूट लांब साप दिसला. तो सीटखाली वेटोळा घालून बसला होता. आम्ही उतरल्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे साप पकडणाऱ्यासंदर्भात चौकशी केली. मात्र हे करेपर्यंत साप पुन्हा विमानात गायब झाला,” असं रुडॉल्फ म्हणाला. आम्हाला कठीण कालावधीमध्ये कसं वागावं यासंदर्भातील प्रशिक्षण दिलं जातं. मात्र यामध्ये सापासंदर्भातील प्रशिक्षणाचा समावेश नसतो असं रुडॉल्फने हसत सांगितलं. हा साप नेमका कुठून आला आणि कुठे गेला हे अद्यापही न उलगडलेलं कोडं आहे. मात्र या सापामुळे विमानाचं आपत्कालीन लॅण्डींग झालं हे मात्र खरं.
