लोणंद पुणे रस्त्यावर नीरा रेल्वे उड्डाणपुलाजवळ पालखी मार्गावरून मंगळवेढ्याहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (एमएच २० बीएल ४१५८ ) जात असताना व नीरेकडून लोणंदला निघालेली भरधाव दुचाकी (एमएच १२ आरव्ही ३१५८) यांच्यात रात्री जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकी वरील ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे, अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे, थोपटेवाडी ता. पुरंदर) हे तीनही युवक जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच लोणंद (ता खंडाळा)पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने व त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने बाजूला करून मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे, थोपटेवाडी ता. पुरंदर येथील रहिवासी होते. ते कामानिमित्त लोणंद जात असताना हा अपघात झाला. अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
