राज्यात करोनाचे ७११ नवीन रुग्ण, चार रुग्णांचा मृत्यू

 राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, राज्यामध्ये मंगळवारी ७११ नवे रुग्ण सापडले. तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ७९२ इतकी झाली आहे. राज्यात चार करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे.

राज्यात मंगळवारी ७११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ४६ हजार ३०१ इतकी झाली आहे. तसेच मंगळवारी चार करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४४९ इतकी झाली आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. मंगळवारी राज्यामध्ये ४४७ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९ लाख ९४ हजार ०६० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ३ हजार ३२४ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ कोटी ६६ लाख ५५ हजार ३८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१ लाख ४६ हजार ३०१ (०९.४० टक्के) नमुने बाधित आले आहेत.

विमानतळावरील बाधितांची संख्या ५५ वर

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांपैकी २ टक्के प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येते. यापैकी करोनाबाधित झालेल्या प्रवाशांचे नमूने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येतात. विमानतळावर मंगळवारी आणखी तीन करोनाबाधित रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या ५५ वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *