गोवंडीतील मनोरंजन मैदान मियावाकी वनाने बहरले ; साडेतीन हजार देशी वृक्षांची लागवड

गोवंडी पूर्व परिसरातील देवनार व्हिलेज रोड येथील मुंबई महानगरपालिकेच्या  दत्ताराम गणपत पाटील मनोरंजन मैदानात मियावाकी वन साकारण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने या मैदानात कदंब, तामण, बदाम करंज, सीता अशोक, शिरीष, रतन आदी सुमारे साडेतीन हजार देशी झाडांची लागवड केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०१९ मध्ये मियावाकी पद्धतीने शहरी जंगल उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत चार लाख झाडांची लागवड करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता.  जपानी शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी शोधलेल्या सघन वृक्ष लागवड अर्थात मियावाकी पद्धतीने मुंबईत ठिकठिकाणी चार लाखांहून अधिक देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दोन वर्षांत चार लाख झाडांची लागवड करण्यासाठी ६४ लहान – मोठे भूखंड निवडण्यात आले होते. एका चौरस मीटरमध्ये तीन झाडे याप्रमाणे या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. अनेक व्यावसायिक संस्थांमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर निधी) शहरी वनांची निर्मिती करण्यासाठी मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *