तोतया वाहतूक पोलीस बनून तो दुचाकीस्वारांना लुटत होता, शेवटी असे फुटले बिंग, ३ तासांत पकडले

वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून पैसा उकळणाऱ्या एका तोतया वाहतूक पोलिसाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे हा तोतया पोलीस पूर्वी उल्हासनगर येथे ट्रॅफिक वॉर्डनचे काम करत होता. दिलीप पाटील (वय ३७ वर्षे) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण नेतिवली परिसरात राहणारे इंद्रजीत गुप्ता हे फेरीचा व्यवसाय करुन गुरुवारी दुपारी आपल्या दुचाकीवरुन मेट्रो मॉल परिसरातून जात होते. यावेळी दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यातील एकाने इंद्रजीत यांना आपण पोलीस असल्याचे सांगत लायसन्स दाखविण्यास सांगितले. यावेळी गुप्ता यांनी लायसन्स नसल्याचे सांगितल्याने त्या दोन भामट्यानी त्यांना तुम्हाला अकराशे रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले. तसेच पोलिस चौकीत यावे लागेल अशी बतावणी केली.

यातील एक भामटा इंद्रजित यांच्यासोबत त्यांच्या गाडीवर बसला. इंद्रजीत यांना बोलण्यात गुंतवून चक्कीनाका येथील वखारीजवळ आरोपींनी गाडी थांबवत गुप्ता यांना खाली उतरविले. त्यानंतर गाडी घेऊन आरोपी पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचं गुप्ता यांच्या लक्षात येताच, त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्ही च्या मदतीने अवघ्या तीन तासात आरोपी दिलीप याला अटक केली. दिलीप हा उल्हासनगर महापालिका हद्दीत ट्रॅफिक वार्डन म्हणून पूर्वी काम करत होता. काही गुन्ह्यांप्रकरणी त्याच्यावर कल्याण न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायालयातील सुनावणीसाठी तो गावावरुन कल्याण येथे आला होता. कल्याण येथे येताच त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाहतूक पोलिस असल्याची बतावणी करत मोटारसायकल स्वारांस लुटण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी दिलीप याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा तपास सुरु असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *