महाराष्ट्र विधानसभेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधीमंडळात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला, असून अनेक घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पानंतर विरोधी पक्षाने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला मोठं गिफ्ट दिलं आहे. धनगर समाजातील लोकांना किमान २५ हजार घरं देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मुंबई येथे धनगर समाजाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
धनगर समुदायाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण वेगवेगळ्या घरांच्या योजना तयार करतो. मात्र, त्याचा धनगर समाजाला पाहिजे तसा फायदा मिळत नाही. त्यामुळे आम्ही स्पष्टपणे ठरवलं की, घरं तर बांधायची आहेतच. पण यातील २५ हजार घरं धनगर समाजाला मिळाली पाहिजेत. ही संख्या किमान आहे, कमाल नाही. त्यामुळे यापेक्षा अधिक घरंही मिळाली तर अधिक चांगलं आहे. लोकांना हळूहळू योजना समजतील आणि ते या योजनांचा लाभ घेतील. आपल्याला या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्या लागतील, ही आपली जबाबदारी आहे.”
