घरून कार्यालयीन कामाच्या नावाखाली पेडर रोड येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. आरोपींंनी महिलेला टेलिग्राम ग्रुपवर विविध कामे पूर्ण करण्यास सांगितले. तसेच चांगला परतव्यासाठी बिटकॉइन या कूट चलनात गुंतवणूक करण्यास सांगून साडेदहा लाखांची फसवणूक केली.
तक्रारदार महिलेने ३१ जानेवारीला पहिल्यांदा फेसबुकवर घरून कार्यालयीन काम करण्याबाबतची जाहिरात पाहिली. तिने या जाहिरातीवर टिप्पणी केल्यानंतर त्यांना एक दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तिला यूट्यूब व्हिडिओ लाईक करून स्क्रीनशॉट पाठवून पैसे कमवायचे असल्याचे सांगितले.
आरोपीने तक्रारदाराला यूट्यूब व्हिडिओ लिंक टेलिग्रामवर पाठवल्या. महिलेने व्हिडिओ लाईक केल्यानंतर तिला प्रथम दीडशे रुपये मिळाले. सोपे काम असल्यामुळे महिलेने ते काम सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर टेलिग्रामवर येणाऱ्या लिंकवरील चित्रफीत लाईक करण्यास सुरूवात केली, पण महिलेच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्याबाबत चौकशी केल्यावर तिला सांगण्यात आले की चांगले पैसे मिळवण्यासाठी तिला काही कामे पूर्ण करावी लागतील आणि काही पैसेही गुंतवावे लागतील. पैसे बिटकॉईनमध्ये गुंतवले जातील, अशी माहिती आरोपींनी दिली.
यानंतर महिला प्रत्येक काम पूर्ण करू लागली आणि त्यांच्या सूचनेनुसार पैसेही गुंतवू लागली. तिच्या आभासी खात्यात पैसे जमा होत असल्याचे तिला दिसत होते, असे पोलीस सूत्राने सांगितले. तिच्या आभासी खात्यात २० लाख रुपये जमा झाले होते. तिने पैसे काढण्यासाठी विनंती केली. पण पैसे बँक खात्यात जमा झाले नाही. त्याबाबत महिलेने चौकशी केली असता पैसे काढण्यासाठी तिला आणखी एक काम पूर्ण करावे लागेल आणि आठ लाख रुपये जमा करावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यावेळी तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, पण तोपर्यंत महिलने १० लाख १५ हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या विविध खात्यांमध्ये जमा केले होते. बुधवारी तिच्या कुटुंबीयांना कळवल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.तिच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला
