कराडलगतच्या मुंढे येथील चिमुकल्या सख्या लहान बहिण, भावाचा उलट्या व खोकल्याच्या त्रासानंतर मृत्यू झाला. धान्याची साठवणूक करत असताना त्याला कीड लागू नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने ही हृद्य हेलावून सोडणारी दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
श्लोक अरविंद माळी (वय ३ वर्षे) व तनिष्का अरविंद माळी (वय ७, दोघेही रा. मुंढे, ता. कराड) अशी मृत्यू पावलेल्या बालकांची नावे आहेत.
श्लोक याला उलट्याचा त्रास होऊ लागल्याने काल सोमवारी (दि १३) कराडमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच कालच श्लोकचा मृत्यू झाला. तर आज मंगळवारी (दि १४) तनिष्काला उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तिलाही रुग्णालयात हलवण्यात आले. तिचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर त्यामध्ये अंतर्गत अतिरक्तस्त्रावामुळे व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर तनिष्काचे मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. परंतु, हा अहवाल अद्याप उपलब्ध झाला नसल्याने तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. दरम्यान, या घटनेने मुंढेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास फौजदार प्रवीण जाधव करत आहेत.
दरम्यान, मुंढे (ता. कराड) येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्याचे माळी यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.
