नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील वेदांतनगर भागातील फरशी व्यापारी विकास शर्मा यांच्या घरात शिरून त्याच्या कुटुंबीयाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेबाबत संदेशवहनावर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने दरोडा टाकणारी राजस्थानची टोळी पकडली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दरोड्याच्या घटनेचा सूत्रधार म्हणून विकास शर्मा यांच्या घरातील नोकर प्रदीप स्वामी याचे नाव समोर येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी याच गुन्ह्यातील आरोपी पवनकुमार जाट, राजेंद्रकुमार जाट, पंकज स्वामी, मनिष सेन (सर्व रा.नौसल, राजस्थान) यांना अटक केली. त्यांनी प्रदीप शंकरलाल स्वामीच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेले मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेले हत्यारे हस्तगत केले असल्याचे पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी सांगितले की, वेदांतनगर भागात वास्तव्यास असलेले फरशी व्यापारी विकास शर्मा हे घटनेच्यावेळी घरी नव्हते. त्यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून नौकर असलेल्या प्रदीप शंकरलाल स्वामी याने आपल्या भावासोबतच्या वादाचा बदला घेण्यासाठी शर्मा यांच्या घरी पाळत ठेवून घरी पत्नी, मुलगा, मुलगीच असल्याचे पाहून आपल्या पाच साथीदारांना बोलावले. यातील तिघांनी शर्मा यांच्या घरात प्रवेश केला व त्यांची पत्नी, मुला-मुलीच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पेन्डालसह लंपास केले. ही माहिती धाडसी महिलेने भाग्यनगर पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी लगेचच संदेश वहन केल्यानंतर भाग्यनगर पोलीस स्थानकातील कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी शिवराज गोणारकर, बोरकर या दोघांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. याच भागात काल झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपी शोधण्यासाठी लिंबगावचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांची टीम कार्यरत होती. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितरित्या फिरणार्या तिघा आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे विचारणा केली असता संबंधित गुन्हा केला असल्याची कबुली दिली. हा गुन्हा फरशी काम करणारा शर्मा यांचा नोकर प्रदीप स्वामी याने सांगितल्याने केला असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला भोकरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सपोनि चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती.
