भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सावत्र आईवर कुऱ्हाडीने वार करून ठार केले. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सावत्र मुलाला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल नऊ जानेवारीला दिला आहे. गडचिरोलीमध्ये हा प्रकार घडला.
कुम्मी रैनू नरोटे (वय ४५ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. येसू रैनू नरोटे (वय २९ वर्ष, रा. दोघेही हालेवारा) असे आरोपीचे नाव आहे.
११ जानेवारी २०१९ रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आरोपी येसू याने फिर्यादी रामा रैनू नरोटे याच्याकडे तंबाखू मागितले. फिर्यादीने तंबाखू नाही आहे असे सांगितले. यावरून भांडण होऊन आरोपी हा फिर्यादीच्या अंगावर धावून आला. यात दोघांमध्ये भांडण झाले.
आरोपीची सावत्र आई कुम्मी नरोटे ही भांडण सोडविण्यास आली असता आरोपी येसू याने जवळ असलेल्या कुऱ्हाडीने कुम्मी च्या डोक्यावर, मानेवर वार करून गंभीर दुखापत केली. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता दिनांक २१ जानेवारी २०१९ रोजी ती उपचारांदरम्यान मरण पावली.
रामा नरोटे यांनी दिलेला तक्रारीवरून आरोपी विरोधात उप पोलीस स्टेशन कसनसूर मध्ये कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर कलम ३०२ वाढविण्यात आले.
