रविवारी हार्बर, ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द; मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लाॅक नाही, पश्चिम रेल्वेवर ब्लाॅक

 विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी (८ जानेवारी) मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी, नेरुळ आणि हार्बरवरील सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लाॅक कालावधीत या मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कर्जत, खोपोली, कसारा या मुख्य मार्गावर मात्र मेगाब्लाॅक घेण्यात आलेला नाही. लोकलसाठी रविवारचे वेळापत्रक लागू असेल.

 मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ११.४० या कालावधीत मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे. ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द असतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे-वाशी, नेरुळ अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे ब्लाॅक कालावधीत या मार्गावरील लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवर विविध कामांसाठी रविवारी अंधेरी ते बोरीवली स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी तीन या कालावधीत मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल अंधेरी ते बोरीवली दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. ब्लाॅक काळात काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही बोरीवली लोकल फेऱ्या हार्बर मार्गावरुन गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *