रेशन कार्ड वेळेवर न दिल्याने निराश झालेल्या एका वृद्धाने तहसील कार्यालयातच महिला कर्मचाऱ्यासमोर स्वत:चे कपडे काढले. वसईमधील या वृद्ध माणसाने पालघरच्या तहसील कार्यालयात हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.
वसई पोलिस स्टेशनचे ड्यूटी अधिकारी एस एम पाटील यांच्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध इसम भावासह मंगळवारी साडे पाचच्या सुमारास तहसील कार्यालयात गेला आणि महिला कर्माचाऱ्याकडे आपल्या आईचं रेशन कार्ड देण्याची मागणी केली. रेशन कार्ड तातडीने द्या अन्यथा आम्ही इथेच स्वत:चे कपडे काढू, अशी धमकीच त्यांनी दिलं.
त्यानंतर दोघांपैकी एकाने स्वत:च शर्ट काढलं, त्यानंतर पँट, इतकंच नाही तर अंतर्वस्त्र काढून महिला अधिकाऱ्यासमोर चुकीचं वर्तन केलं, असं पाटील म्हणाले.
दोन्ही भावांविरोधात भारतीय दंडविधान कलम 509 आणि कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.

