ब्रिमस्ट्रोवॅड अहवालानुसार भांडूप येथील उषानगर नाल्यावरील तीन धोकादायक पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या तीन पुलांच्या पुनर्बांधणीसाठी महानगरपालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. यासाठी ५३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या पुलाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे.
भांडूप पूर्व येथील वीर सावरकर मार्गावर मेनन कॉलेजजवळ चामुंडानगर येथील नाल्यावरील पूल, चामुंडानगर आणि हेमापार्क यामधील मेनन कॉलेज येथील नाल्यावरील पूल आणि वीर सावरकर मार्गावर हेमापार्क नाल्याजवळील पूल या तीन पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या तीन पुलांच्या भिंती व धारणस्तंभ अत्यंत खराब झाल्यामुळे पूर्णपणे निष्काषित करण्यात येणार आहेत. या पुलासाठी आराखडे, नियोजन, संकल्पचित्रे, अंदाजपत्रक व मसुदा निविदा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या संकल्पनाचित्रांनुसार २०२१ मध्ये या पुलांचे काम सुरूही झाले आहे. या सल्लागाराला महानगरपालिका ५३ लाख रुपये सल्ला शुल्क देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पूल विभागाने प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.
