समृद्धी महामार्गावर एसटी महामंडळाने ३० आसने (पुशबॅक पध्दतीची) आणि १५ शयनयान (स्लीपर)असलेली विनावातानूकुलीत बस सेवा नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणांहून १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मार्गावरून दररोज रात्री ०९.०० वाजता बस सुटून पहाटे ०५.३० वाजता पोहोचते. या बससेवेसाठी प्रतिप्रवासी १,३०० रुपये आणि मुलांसाठी ६७० रुपये प्रवासभाडे आकारण्यात येते. याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाद्वारे ४२ प्रवासी क्षमतेची शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी ११०० रुपये आणि मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येते, तर नागपूर ते जालना प्रवासासाठी प्रति व्यक्ति ९४५ रुपये आणि मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आहे. मात्र, नागपूर-शिर्डी आणि नागपूर-औरंगाबाद या दोन्ही मार्गावरील एसटी सेवेला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. नागपूर-शिर्डी मार्गावर फक्त दोन बस फेऱ्या होतात आणि या फेऱ्यांमधून एकूण ३० ते ३५ प्रवासीच मिळत आहेत. नागपूर-औरंगाबाद मार्गावर एसटीच्या या मार्गावरील दोन फेऱ्यांनाही दिवसभरात एकूण २० पेक्षाही कमी प्रवासी मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही सेवा एसटी महामंडळाला परवडत नसून, तोटा सहन करावा लागत आहे. नागपूर-शिर्डी मार्गावर एका फेरीमागे अवघे २० हजार रुपयांच्या आत उत्पन्न मिळत आहे. किमान ५० हजार रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नागपूर-औरंगाबाद एका मार्गावर एका फेरीमागे ४० ते ४४ हजार रुपये उत्पनाऐवजी १० हजार रुपयांच्या आतच उत्पन्न मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खासगी प्रवासी भाडे कमी
नागपूर-शिर्डी मार्गावर खासगी प्रवासी बस वाहतूकदार ८०० ते ११०० रुपये बसभाडे आकारत आहेत. नागपूर-औरंगाबाद प्रवासासाठीही ५०० ते १२०० रुपयांपर्यंत भाडे आकारणी केली जात आहे. महामंडळाने या मार्गावरून बस सुरू करताच खासगी वाहतूकदार तुलनेने कमी भाडे आकारत असल्याचे सांगण्यात आले.
