राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत देशभरातील ८१.३५ कोटी गरिबांना वर्षभर मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा महत्त्वाचा निर्णय़ केंद्रीय मंत्रीमंडळाने गुरुवारी घेतला.
अन्नधान्यमंत्री पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवण्याचा सगळा आर्थिक बोजा केंद्र सरकार उचलणार आहे. तो एकूण खर्च सुमारे दोन लाख कोटी रुपये आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सध्या सरकार महिन्याकाठी माणशी पाच किलो अन्नधान्य दोन ते तीन रुपये किलो दराने देते. त्यात तांदूळ तीन रुपये किलो, तर गहू दोन रुपये किलो असा दर आहे. मात्र आता गरिबांना हे अन्नधान्य मोफत मिळेल.
दरम्यान, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेस येत्या ३१ डिसेंबरनंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या अंतर्गत गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात येते.
