जन्मदात्रीने फेकले बाभळीच्या झुडपात; तीन महिलांनी दिली नवजात बालकाला मायेची उब

नंदुरबारमधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा शहराजवळ असलेल्या एका नदीजवळ झुडपांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत नवजात बाळ बेवारस स्थितीत आढळून आलं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बाळाला परिसरातील नागिरकांनी आणि पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहराजवळ असलेल्या वरखेडी नदीकाठी एक नवजात बालक बेवारस स्थितीत आढळून आलं होतं. काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास काही नागरिकांना बाभळीच्या झुडूपामध्ये हे नवजात बालक काही स्थानिकांना दिसलं होतं. परिसरातील एका महिलेने प्लॅस्टिकच्या पिशवीतून त्या बाळाला बाहेर काढत मायेची ऊब दिली.

नंतर अक्कलकुवा शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या बाळाला तात्काळ अक्कलकुवा पोलिसांना फोन करून बोलावलं. महिला पोलिसांनी एका कापडामध्ये गुंडाळलेल्या सुमारे आठ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाची तपासणी करून प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं आहे. रुग्णालयात देखील महिला कर्मचाऱ्यांनी या बाळाला जवळ घेत उपचार सुरू केलं. हे बाळ स्री जातीचं असून सव्वा किलो वजनाचं आहे. बाळ सुखरूप असून त्याच्यावर प्राथमिक उपचार रुग्णालयात करण्यात आलं आहेत. पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

या बाळाची प्रसुती नेमकी कुठे झाली यासंदर्भात अक्कलकुवा पोलीस तपास करत आहेत. अशा गोंडस नवजात बालकाला बेवारस स्थितीत सोडल्याने पाहणाऱ्या अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *