रविवारी तुम्हीही मुंबईच्या दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे. कारण उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी (11 डिसेंबर 2022) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर; तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरी ब्लॉक सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ज्यामुळं वाहतुकीवर याचे परिणाम होणार आहेत.
कोणत्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर याचा परिणाम होणार?
हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, 13201 पाटणा-एलटीटी एक्स्प्रेस, काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई एक्स्प्रेस, कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या कल्याण – ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी त्याच्या निर्धारित वेळेनुसार त्या 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. तर काही मेल-एक्स्प्रेस गाड्या थेट दुसऱ्या मार्गाने वळवण्यात येणार आहेत.
चुनाभट्टी ते वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ज्यामुळं ब्लॉकच्या वेळेत सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून वाशी/ बेलापूर/ पनवेलकडे आणि सीएसएमटीहून वांद्रे/ गोरेगावकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएमएमटी मार्गे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा ठप्प राहील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम मार्गाविषयी सांगावं तर, बोरिवली ते गोरेगाव धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सेवा बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसंच या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय लोकल सेवा रद्द असणार आहेत.
