संतापजनक! वडील, चुलत्याने केला १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार; आजोबांकडून विनयभंग

पुण्यातील धानोरी भागात राहणार्‍या १७ वर्षीय तरुणीवर वडील आणि चुलत्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर आजोबांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे धानोरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडील अजय रामेश्वर सिंह (वय-४९) चुलता विजय रामेश्वर सिंह (वय-३३) आणि आजोबा रामेश्वर पोलहान सिंह (वय -७०) या तिघांविरोधात विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित तरुणी उत्तर प्रदेश येथील महुआरकला, चंदोली येथे तिच्या मूळगावी २०१६ ते २०१८ दरम्यान गेली होती. त्यावेळी तिच्यावर चुलता विजय रामेश्वर सिंह याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले तर आजोबा रामेश्वर पोलहान सिंह यांनी तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती पीडित तरुणी पुण्यातील धानोरी भागात कुटुंबियांसोबत राहण्यास आली तर वडील अजय रामेश्वर सिंह यांनी देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला.

कुटुंबातील व्यक्तीकडून तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांमुळे ती शांत राहायची. त्याच दरम्यान तिच्या महाविद्यालयात समुपदेशनचा कार्यक्रम होता. त्यावेळी तिने तेथील व्यक्तीला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आल्यावर,वडील, चुलता यांच्यावर बलात्कार आणि आजोबा यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यातील आरोपी वडील अजय रामेश्वर सिंह याला अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश येथे टीम रवाना करण्यात येणार असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *