सुकामेव्याच्या दरवाढीने ग्राहकांना हुडहुडी; मेथी, डिंकाचे पौष्टिक लाडू महागाईमुळे परवडेना

 दिवाळी आटोपली आणि फराळाच्या लाडवांचे डबे रिकामे झाले की अनेकांना वेध लागतात ते मेथी आणि डिंकाच्या लाडवांचे. थंडी वाढू लागली की आरोग्यवर्धकतेसाठी हे पौष्टीक लाडू करण्यासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरू होते. मात्र यंदा भाजीपाला, खाद्यतेलांच्या दरवाढीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना सुकामेव्याच्या दरवाढीचीही झळ सोसावी लागत असल्याने हे पौष्टीक लाडूही महाग पडणार आहेत.

यंदा सुकामेव्याच्या दरांत २० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण दरवाढीमागील महत्त्वाचे कारण असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून थंडीची वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सुकामेवा, डिंक आणि मेथीच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु जशी मागणी वाढू लागली तशी दरांतही वाढ होत आहे. शहरात केवळ किसमिस आणि काजू भारतातून आयात होतात तर इतर सर्व सुकामेवा गल्फ देशांसह सर्वाधिक प्रमाणात अफगाणिस्तानाहून आयात केला जातो. गत वर्षभरापासून अफगाणिस्तानातून होणारी आयात कमी झाली आहे. याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यदेखील सातत्याने घसरत आहे. घटलेली आयात आणि रुपयाचे घसरणारे मूल्य यामुळे स्थानिक बाजारपेठेवर परिणाम दिसून येत असून, सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *