एका शिक्षण संस्थाचालकाकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून पकडले गेलेले सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना विशेष न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोल्हापूर व सोलापुरातील त्यांच्या निवासस्थानाची झाडाझडती घेण्यात आली असून यात काही आक्षेपार्ह बाबी समोर आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुढील चौकशीसाठी लोहार यांना कोल्हापूरला नेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
जागतिक शिक्षक पुरस्काराचे मानकरी रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत फुलब्राईट अभ्यासवृत्तीसाठी प्रदीर्घ रजा मंजूर करताना शिक्षणाधिकारी लोहार यांनी अनेक गंभीर आक्षेप घेतले होते. त्यामुळे डिसले यांनीही शिक्षण विभागाकडून आपला मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करून शिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. नंतर हे प्रकरण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले असता डिसले यांना दिलासा मिळाला होता. या संपूर्ण प्रकरणात शिक्षणाधिकारी लोहार हे केंद्रस्थानी होते.
