पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असल्याने त्यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवली होती. दसरा मेळाव्याच्या आधी संजय राऊत बाहेर येतील आणि तोफ धडाडेल अशी शिवसैनिकांनी अपेक्षा होती. पण कोठडीत वाढ झाली असल्याने शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात संजय राऊत हजर राहू शकणार नाहीत.
गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती.