मध्य रेल्वेच्या अपमार्गावरील हावडा-मुंबई एक्स्प्रेसमधून जितेंद्र जैन या मुंबईच्या व्यापा-याची दोन किलो ४०२ ग्रॅम सोन्याची चोरी झाली. या संदर्भात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंेद झाली आहे.
अंबोली, अंधेरी पश्चिम येथील सोन्या चांदीचे व्यापारी जितेंद्र जैन सोमवारी रायपूर येथून सोन्याची खरेदी करून हावडा-एक्स्प्रेसमधून वातानुकूलित डब्यामधून आपल्या कारागिरांसह प्रवास करत होते. पहाटे तीनच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कसारा उंबरमाळी स्थानकादरम्यान त्यांना झोपेतून जाग आली.
त्यावेळी ५४ लाख २ हजार किमतीचे एकूण दोन किलो ४०२ ग्रॅम सोने अज्ञात चोरटय़ांनी लांबवल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अंगठय़ा, कानातील रिंगा, नेकलेस, सोन्याची लगड आणि बिस्किटांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे व्यापा-यांमध्ये तसेच प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण झाले आहे. मोठय़ा प्रवासात मौल्यवान साहित्य घेऊन जाताना प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच आपल्यासोबत सहकारी ठेवावेत असे मत व्यापा-यांनी व्यक्त केले आहे.

