पोलिसांच्या नैमित्तिक रजांमध्ये वाढ

राज्यातील पोलीस शिपाई ते निरीक्षक यांच्या नैमितिक रजा १२ वरून २० पर्यंत वाढविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने आणि पूर्णपणे पारदर्शीपणे राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह विभागास दिले आहेत.

वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षांत १२ ऐवजी आठ नैमितिक रजा मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्या वेळी विशेष बाब म्हणून पोलिसांना मात्र १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या होत्या.  मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त यामुळे विशेष बाब म्हणून या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या वेळी राज्यात राबविण्यात येत असलेली पोलीस भरती प्रक्रिया अधिक गतीने आणि पारदर्शीपणे राबविण्याचे आदेश या वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सध्या ७२३१ पोलिसांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आणखी १० हजार भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर शारीरिक चाचणीसाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच भरती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *