मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडता आहात… मंदिरात देवाच्या दर्शनाला निघालात… थांबा आधी अंगावरील दागिने काढून ठेवा! असे सांगून महिला आणि वृद्धांना भररस्त्यात अडवले जाते. वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडील दागिने, पैसे तसेच इतर मौल्यवान वस्तू हातचलाखीने काढून घेतल्या जात आहेत. तोतया पोलिस, धान्यवाटप, मंदिरात दान करायचे आहे, पुढे नाकाबंदी आहे, पुढच्या गल्लीत खून झाला आहे, अशी कारणे सांगून मुंबईकरांना फसविण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात असे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
कष्टाच्या पैशाने खरेदी केलेले दागिने घरात ठेवायचे की, घालून फिरायचे, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. दागिने घरी ठेवले तर घरफोड्या होतात आणि घालून घराबाहेर पडले की बोलबच्चन गँगकडून लुटले जातात.चारकोप येथील किराणा व्यापारी सुभाष हे आपल्या दुकानात बसले होते. यावेळी एक तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने बिस्किटचे दोन पुडे मागितले. सुभाष यांनी बिस्कीट दिल्यानंतर या तरुणाने आपण साईबाबा भक्त असल्याचे सांगितले आणि ५०० रुपये बाजूचे देऊळ उघडले की त्यात ठेवायला दिले. यानंतर बोलता-बोलता सुभाष यांच्या अंगावरील सोन्याची चेन, ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या बघायला मागितल्या. देवळात दान करण्यासाठी पाचशे रुपये देणाऱ्या या तरुणावर विश्वास ठेवत त्यांनी दागिने दिले. काही क्षणातच तो नजर चुकवून कधी पसार झाला, हे त्यांना कळलेच नाही.
रेल्वेत नोकरी करणाऱ्या ५७ वर्षीय शुभांगी या सँडहर्स्ट रोडवरून जात असताना त्यांना एका अनोळखी तरुणाने गाठले. मोफत रेशनवाटप सुरू असून तुम्हाला पण मिळवून देतो, असे सांगून त्या तरुणाने जवळच्या इमारतीखाली उभ्या असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीकडे नेले. अंगावरील दागिने पाहिले तर मालक मोफत धान्य देणार नाही, असे सांगून शुभांगी यांना बांगड्या, अंगठी, सोन्याची माळ, चेन पिशवीत ठेवण्यास भाग पाडले आणि हातचलाखी करून सर्व दागिने लंपास केले.
