वाशिममध्ये मुख्याध्यापकाचा वाढदिवस साजरा करणं शिक्षकांनाच महागात पडलं. कारण स्टेजवर गाणं म्हटल्यानं मुख्याध्यापकांना राग अनावर झाला आणि आता शाळेची परिस्थिती अशी आहे की, शाळेत शिकवायला शिक्षकच नाहीत.
वाशिममधलं माऊंट कारमेल स्कूल. एरव्ही किलबिल करणारे विद्यार्थी आज मात्र धास्तावलेत. कारण आहे पालक आणि माऊंट कारमेल स्कूल प्रशासनामधला वाद. मात्र या वादाची खरी सुरुवात झाली मुख्याध्यापक फादर संजय वानखेडे यांच्या वाढदिनी.
शाळेनं मुख्याध्यापकांचा 31 ऑगस्टला वाढ दिवस साजरा करण्याचं ठरवलं. कार्यक्रम झोकात सुरु होता. पण शिक्षकानं स्टेजवर गाणं म्हटल्याचं मुख्याध्यापकांना खटकलं आणि वादाची ठिणगी पडली.
स्टेजवरच्या गाण्यानं शाळेचं नियम मोडल्याचं कारण देऊन मुख्याध्यापक असलेल्या फादर वानखेडे यांनी शिक्षिका श्वेता पळशीकर यांना अपमान केल्याचा त्यांचा आरोप आहे. पळशीकर यांना इतका धक्का बसला की त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार घेण्याची वेळ आली आहे.
फादरच्या भीतीनं तर दहा शिक्षक-शिक्षिकांनी सामूहिक रजा घेतली.त्यामुळं शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत. त्यामुळं पालकांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन फादर वानखळे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.
माऊंट कारमेल स्कूलमधल्या वादाची ही काय पहिली वेळ नाही. याआधीही अनेक कारणावरून शाळा आणि पालकांमध्ये खटके उडाले आहेत. मात्र यामध्ये नुकसान विद्यार्थ्यांना सहन करावं लागत आहे.

