पाकिस्तान: ईशनिंदेची खोटी तक्रार, हिंदू तरूण थोडक्यात बचावला

पाकिस्तानमध्ये कुराणबाबत काढलेल्या अपशब्दाबद्दल एका हिंदू सफाई कर्मचाऱ्याविरुद्ध ईशनिंदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक कुमार असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या वक्तव्यानंतर पाकिस्तानमधील नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते. अशोक कुमारच्या घऱाबाहेर जमा होत नागरिकांनी त्याच्यावर हल्ला कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अशोक कुमारची सुटका केली.

पाकिस्तानातील हैदराबादमधील एका हिंदू अल्पसंख्याक समुदायाच्या स्वच्छता कर्मचाऱ्याशी झालेल्या भांडणानंतर एका स्थानिक रहिवाशाने ही तक्रार नोंदवली होती. स्थानिक रहिवाशाशी वैयक्तिक भांडणामुळे स्वच्छता कर्मचाऱ्याला लक्ष्य करण्यात आले असल्याचा दावा पोलिसांनी केले असल्याचे ट्वीट मुबशीर झैदी यांनी केलं आहे.

 गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

ईशनिंदा केल्याचा आरोप असणाऱ्या अशोक कुमारला मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिक जमा झाले होते. पोलिसांनी अशोकला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. अखेर संतापलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या अशोक कुमारला हैदराबादच्या सदर येथील राबिया सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये कठोर ईशनिंदा कायदा

पाकिस्तानमध्ये ईशनिंदा कायदा कठोर आहे. ईशनिंदेच्या आरोपावरून अनेकांना ठार मारण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये, श्रीलंकेच्या एका कारखान्याच्या व्यवस्थापकाला ईशनिंदेच्या आरोपावरून पाकिस्तानी जमावाने मारहाण करून जाळून टाकले होते. या घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी हा “पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस” म्हणून संबोधले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *