राज्यात दहीहंडी साजरी केली जात असताना मुंबईत हंडी फोडताना १३१ गोविंदा जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
दरवर्षी उंचच उंच थर लावून ‘बोल बजरंग बली की जय.. गोविंदा रे गोपाळा..’ या तालावर बेधुंद होत उत्साहवर्धक वातावरणात मुंबईसह राज्यभरात दहीहंडी साजरी केली जाते. मात्र यावर्षी न्यायालयाचे निर्बंध आणि दुष्काळामुळे दहिहंडीच्या उत्साहावर विरजण पडले.
दहीहंडीनिमित्त राज्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही मुंबईत विविध ठिकाणी उंच मनोरे रचताना खाली पडून आतापर्यंत १३१ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मुंबईतील केईएम, नायर, सायन, सेंट जॉर्ज, राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, दहीहंडी बांधताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील दिघाशी येथे ही दुर्घटना घडली. गणेश अनंता पाटील (२९) असे या व्यक्तीचे नाव असून लोखंडी खांब डोक्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
ऐन दुष्काळात भाजपा-शिवसेनेचा भांगडा
राज्यासमोर दुष्काळाचे भीषण संकट उभे ठाकले असताना संवेदनशीलता दाखवत अनेक दहीहंड्या रद्द झाल्या असताना भाजपा-शिवसेनेच्या अनेक आमदारांनी मात्र सत्तेचा मद दाखवत दहीहंडीच्या नावाखाली निलाजरेपणाचा कळस गाठला. बीभत्स नाचगाणी, पाण्याची नासाडी याचबरोबर या लोकप्रतिनिधींच्या दहीहंडी उत्सवात गोविंदांची सुरक्षा आणि थर याबाबतचे न्यायालयाचे नियम-आदेश धाब्यावर बसवण्यात आले. विशेष म्हणजे याबाबत परस्परांवर आरोप करत, दुस-यांकडे बोट दाखवून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही सत्तेतील सहभागी पक्षांचे हे लोकप्रतिनिधी करत होते.
दादर, वरळी, घाटकोपर, दहिसर, अंधेरी, बोरिवली, ठाणे येथे हंडया फोडण्यासाठी येत असलेल्या गोविंदांमुळे शहरातील रस्त्यांवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवण्यात आले.

