पश्चिम उपनगरीय रेल्वे प्रवाशांची या आठवड्यात मेगाब्लॉकमधून सुटका झाली असून उद्या (रविवार, ७ ऑगस्ट) मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती, पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मात्र शनिवारी मध्यरात्री सव्वा बारापासून वसई यार्डच्या कामांसाठी तीन तासांसाठी ब्लॉक घेण्यात आला. विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मात्र ब्लॉक असणार आहे.
माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद लोकल माटुंगा येथून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथून पुन्हा डाउन जलद मार्गावर पूर्ववत होतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथून माटुंग्यापर्यंत अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या मार्गवरील लोकल पंधरा मिनिटे उशिराने धावतील.
दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या ब्लॉक काळात रद्द
हार्बर मार्गावर रविवारी पनवेल- वाशी अप आणि डाउन सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या ब्लॉक काळात रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- वाशी दरम्यान विशेष लोकल
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. तर ठाणे – वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल आणि बेलापूर, नेरुळ-खारकोपर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
