देशात मंकीपॉक्सचा शिरकाव (Monkeypox virus) झाल्यानंतर आता त्याचा संसर्ग महाराष्ट्रातही दिसून येत आहे. त्यामुळे पालकांची चांगलीच झोप उडाली आहे. कारण बालकांमध्ये हात-पाय-तोंडाच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बालकांमध्ये मंकीपॉक्ससारखी लक्षणं असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण मुंबई, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात आहे. याची लक्षणं मंकीपॉक्ससारखी असल्यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. हात-पाय-तोंड हा विषाणूजन्य संसर्ग असून या आजारामध्ये हात, पाय आणि तोंडाजवळ पुरळ येऊन मुलांना ताप येतो. यामध्ये तोंडामध्ये अल्सरदेखील होतो. पावसाळ्यात ज्याप्रमाणे विषाणूजन्य संसर्गाची बाधा होऊन ताप,सर्दी, खोकला होतो, त्याचप्रमाणं हा संसर्गदेखील पावसाळ्यात उद्भवतो. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा संसर्ग दर पावसाळ्यात मुलांमध्ये होत असल्याचे आढळले आहे.
देशात Monkeypox virusबाबत बारकाईने निरीक्षण करण्यासाठी आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यासाठी मंकीपॉक्सवरील टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. तर WHO ने मंकीपॉक्स ही जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
