जीवघेण्या करोना व्हायरसपासून अद्यापही जग सावरलं नाही. अशात आता मंकीपॉक्सने या गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. शरीरात पुरळ उठणे, डोकेदुखी, थकवा, ताप यांसारखी लक्षणे असलेल्या या आजाराने आरोग्य तज्ज्ञ आणि सरकारची चिंता वाढवली आहे.
ताज्या आकडेवारीवरून, आतापर्यंत जगातील ७८ देशांतील १८,००० लोकांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे. यातील ७० टक्के प्रकरणं युरोपमधून तर २५ टक्के अमेरिकेतील आहेत. मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊनही आत्तापर्यंत फक्त ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात सुमारे १८०० लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत.
भारतातही मंकीपॉक्सचा शिरकाव (Monkeypox Cases In India)
करोनानंतर आता भारतातही मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे. देशात आतापर्यंत ५ लोकांना मंकीपॉक्स झाला आहे. यामध्ये ३ केरळमधून आणि एक प्रकरण दिल्लीतलं आहे. चिंतेची बाब ही की नोएडा आणि गाजियाबादमध्येही मंकीपॉक्सचे ३ रुग्ण समोर आले आहेत. सध्या त्यांच्या नमुण्यांची चाचणी सुरू आहे. अधिक माहितीनुसार, झारखंडमध्येही मंकीपॉक्सचा रुग्ण समोर आला आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना (Monkeypox Guidelines India)
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा गंभीर रोग जनावरांपासून माणसात पसरला आहे. मंकीपॉक्स फक्त काही प्रकरणांमध्येच प्राणघातक ठरून शकतो. मात्र, यामुळे याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते. मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला २१ दिवस वेगळं राहणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे मंकीपॉक्सचा उष्मायन काळ २१ दिवसांचा असतो. याशिवाय मास्क घालणे बंधनकारक आहे. सतत हात धुणे. मंकीपॉक्सने प्रभावित त्वचा पूर्णपणे झाकून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.
