एड्सबाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या काही औषधांचा ठाणे जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला असून सध्या रुग्णांची संख्या पाहता उपलब्ध औषधांचा साठा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून औषधे मिळण्यास विलंब होऊ लागला आहे. दुसरीकडे सीएसआर फंडातून ‘डीटीजी’, ‘सीपीव्ही’, ‘आरटीव्ही’ या औषधांच्या ३५० बाटल्या मिळाल्या असून केवळ १५ दिवस पुरतील एवढीच ही औषधे आहेत. या औषधांची कमरता गेल्या दोन महिन्यांपासून जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून विविध राज्यांना औषधांचा पुरवठा केला जात असून ही औषधे राज्यात आल्यानंतर तेथून एआरटी सेंटरला पाठवली जातात. एआरटी सेंटरमधून एचआयव्ही-एड्स संसर्गित रुग्णांना औषधे देण्यात येतात. ठाणे जिल्ह्यात ठाणे, उल्हासनगर, वाशी, कल्याण, भिवंडी, मिरारोड, कळवा अशी एकूण सात एआरटी सेंटर आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून ‘डीटीजी’, ‘सीपीव्ही’, आणि ‘आरटीव्ही’ या औषधांचा पुरवठा करण्यास राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून विलंब होत असल्याने जिल्ह्यात या औषधांची मोठी कमतरता भासू लागली आहे. पुढील एक किंवा दोन महिने या संस्थेकडून ही औषधे मिळण्याची शक्यता धूसर आहे.
सीएसआर फंडातून डीटीजी, सीपीव्ही आणि आरटीव्ही या औषधांच्या केवळ ३५० बाटल्या मिळाल्या असून केवळ १५ दिवस पुरतील इतकीच ही औषधे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व एचआयव्ही-एड्स संसर्गित रुग्णांना औषधांची कमतरता भासू नये म्हणून राज्यपातळीवर पाठपुरावा तसेच स्थानिक पातळीवर प्रशासन, सीएसआरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
