झोपडीवर ट्रक उलटल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू ; ट्रक चालक ताब्यात

नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगत असलेल्या झोपडीवर उलटला. या घटनेत झोपडीमध्ये झोपलेल्या १४ वर्षीय मुलगी मधू भाटी हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

मुंबई-नाशिक महामार्गालगत ठिकठिकाणी झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. माजिवडा भागातही अशाचप्रकारे झोपड्या आहेत. शुक्रवारी सकाळी ठाण्याहून नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरून एक ट्रक जात होता. ट्रक समोर असलेल्या वाहनाने अचानक त्याचे वाहन थांबविले. त्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्यालगत असलेल्या एका झोपडीवर जाऊन उलटला. या झोपडीमध्ये १४ वर्षीय मधू भाटी झोपली होती. तिच्या अंगावर हा ट्रक उलटला होता.

पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा ट्रक क्रेनच्या सहायाने बाजूस करून मधूला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *