दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर उड्डाण घेतलेली दोन आंतरराष्ट्रीय विमाने पुन्हा बोलविण्यात आली आहेत. तर, एका विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
दिल्ली विमानतळाच्या गुडगावमधील कॉल सेंटरला आज (शनिवार) पहाटे दीडच्या सुमारास विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने हाँगकाँगला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या 9डब्लू078, हाँगकाँगलाच जाणाऱ्या कॅथी पॅसिफिकच्या सीएक्स694 आणि झ्युरिचला जाणाऱ्या स्वीस एअरच्या एलएक्स147 या तीन विमानांत बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. दूरध्वनी येण्यापूर्वीच जेट आणि कॅथीच्या विमानांनी उड्डाण घेतले होते. त्यामुळे या दोन विमानांना पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले. तर, स्वीस एअरच्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.
अखेर या तिन्ही विमानांची आणि प्रवाशांच्या सामानांची चौकशी केल्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले. यानंतर तिन्ही विमानांच्या उड्डाणांचा मार्ग मोकळा करण्यात आला.
