सासरी चोरी करणारा जावई अटकेत; साडेतीन लाखांचे दागिने जप्त ; हडपसर भागातील घटना

सासरकडील मंडळी चित्रपट पाहायला गेल्याची संधी साधून जावयाने सोन्याचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी जावयाला अटक केली असून त्याच्याकडून साडेतीन लाखांचे दागिने जप्त केले आहेत. निखील संभाजी पवार (वय २३, रा. संभाजीनगर चाळ, जयसिंगपूर, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे.

हडपसरमधील इंद्रायणी सोसायटीत १० जुलै रोजी घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होत होता. जावई पवार याने दागिने चोरल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रशांत दुधाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पवारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सासरकडील मंडळी चित्रपट पाहायला गेल्याची संधी साधून बनावट चावीने सदनिकेचा दरवाजा उघडून चोरी केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, अविनाश गोसावी आदींनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *