मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काहीतरी मोठं षडयंत्र सुरू असल्याचा खळबळजनक आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. शिंदेंना कमी दाखवण्यासाठीच त्यांना चिठ्ठी देणं, प्रॉम्टिंग करण्याची कामं सुरू आहेत. आणि यामागे काहीतरी मोठं षडयंत्र असून आपल्याला शिंदेंची काळजी वाटत असल्याचंही सुळेंनी नमूद केलंय.
आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सारख्या चुका काढल्या जात आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांना विषय माहित नाही की त्यांच्या पाठिमागे मोठं षडयंत्र रचलं जात आहे की जेणेकरुन मुख्यमंत्री हतबल दिसावेत आणि लोकांच्या डोळ्यातून उतरावेत असं मोठं षडयंत्र भाजप मुख्यमंत्र्यांविरोधात रचत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
नवीन आलेलं सरकार हे गोंधळलेलं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांचा अपमान होणाऱ्या अनेक गोष्टी चॅनलवर दिसत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. या राज्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो तो राज्याचा मुख्यमंत्री असतो. माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान जागा आहे आणि जागा राहिली. दिल्लीपुढे हा महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही असे देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
