मुंबईतील पाच तरुणांचा गट हा भटकंतीसाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या तावली डोंगरावर आला होता. मात्र डोंगरावरील वाट चुकल्याने ते अडकून बसले होते. अडकलेल्या तरुणांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली होती. त्यानंतर तातडीने हिललाईन पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या पाचही तरुणांची सुटका केली आहे.
पावसाळ्यात मलंगगडच्या डोंगराळ भागात पर्यटनासाठी तरुण मोठ्या संख्येने येत असतात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना रस्ते आणि परिसरातील माहिती नसल्याने तरुण अडकतात. त्यामुळे पर्यटकांची मोठी कोंडी झालेली असते. डोंगराळ भागात मोबाइलचे नेटवर्क देखील नसल्याने ते कोणाशी संपर्क देखील करू शकत नाहीत. मात्र, भरकटलेल्या पाच पर्यटकांपैकी प्रणव जगताप याने रविवारी संध्याकाळच्या सुमारास ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर तातडीने हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जयेश पादीर आणि संभाजी नपते यांनी कुशिवली येथील ग्रामस्थ सुभाष पाटील व इतरांसह तावली डोंगर गाठून या पाचही तरुणांची सुटका केली.
सकाळच्या सुमारास गेलेले हे तरुण दुपारी भरकटले होते. डोंगरावर कोणत्याही प्रकारच्या पायवाटा दिसून येत नसल्याने त्यांनी एका भल्यामोठ्या दगडाचा आसरा घेतला होता. अखेर हिललाईन पोलिसांच्या सतर्कतेमुळे या पाचही तरुणांची सुटका करण्यात पोलिसांना रविवारी यश आले आहे. या संदर्भात बुधवारी ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. ग्रामस्थ आणि पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे भरकटलेल्या तरुणांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कौतुक केले आहे.
