राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्या प्रकरणी आज ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अभिनेत्री केतकी चितळे हिला अखेर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. २० हजार रुपयांच्या जातमुचकल्याचा ठाणे न्यायालयाने केतकी चितळे हिला जामीन मंजूर केला आहे. केतकीला शरद पवारांवरील फेसबुक पोस्ट प्रकरण आणि रबाळे पोलीस ठाण्यातील अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्याने तिच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उद्या केतकीची ठाणे कारागृहातून सुटका होणार आहे.
शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट टाकल्या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात केतकी चितळे हिला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर केतकीच्या विरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात केतकीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर ना पुन्हा अर्ज केला, ना रबाळे पोलिसांनी अटक केली. मात्र शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच रबाळे पोलिसही अटक करण्यात पुढे आले. त्यांनी केतकी चितळे यांचा ताबा घेतला. त्यानंतर आठवड्यापूर्वी केतकीला अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात २५ हजाराच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र कळवा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत होती. केतकी चितळेचा न्यायालयीन कोठडीचा प्रवास सुरु असताना आज २२ जून २०२२ रोजी ठाणे न्यायालयात जामीन मंजूर झाल्यामुळे फुलस्टॉप लागला.
