प्रवाशांनो, प्रवासात मोबाइल सांभाळा ; ठाणे, बोरिवली, कुर्ला स्थानकांत सर्वाधिक मोबाइल चोरी

मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकात मोबाइलवर बोलण्यात दंग असलेल्या, तसेच गर्दीच्या वेळी लोकल प्रवासात प्रवाशांचा मोबाइल लंपास केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीला गेलेला मोबाइल मिळवण्यासाठी प्रवाशांना रेल्वे पोलिसांकडे सतत खेटे घालावे लागतात. जानेवारी मे २०२२ या पाच महिन्यांत ३ हजार ४६९ मोबाइल चोरीला गेल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे. चोरीला गेलेले मोबाइल सापडण्याचे प्रमाण कमी असून अवघे ९७५ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. सर्वाधिक मोबाइलची चोरी मध्य रेल्वेवरील ठाणे, पश्चिम रेल्वेवरील बोरिवली आणि हार्बरवरील कुर्ला स्थानक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

लोकल प्रवासात गर्दीच्या वेळी चोर प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला मारत असूनचार ते पाच जणांच्या टोळके प्रवाशाला बोलण्यात किंवा भांडणात गुंतवून त्याचा मोबाईल लंपास करीत असून याबाबत प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर मोबाइल चोरीचा तपास करण्यात येतो. परंतु चोरीला गेलेल्या काही मोबाइलचा मागमूसही लागत नाही. लोहमार्ग पोलिसांनी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या उपनगरीय हद्दीत पाच महिन्यांत २ हजार २९८ आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर १ हजार १७१ मोबाइलच्या चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी मध्य रेल्वेवर केवळ ५९० आणि पश्चिम रेल्वेवर ३८५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. चोरीला गेलेल्या एकूण ३ हजार ४६९ मोबाईलची किंमत ही ६ कोटी ५१ लाख २९ हजार रुपये आहे.

सर्वाधिक मोबाईल चोरी होणारी रेल्वे स्थानके

मध्य रेल्वे – ठाणे, कल्याण, दादर, कुर्ला, घाटकोपर

पश्चिम रेल्वे – बोरिवली, अंधेरी, दादर, कांदिवली, मालाड, नालासोपारा, वांद्रे

हार्बर रेल्वे – कुर्ला

७६५ मोबाइल परराज्यात

पाच महिन्यात चोरीला गेलेल्या मोबाइलचा माग घेतला असता यातील ७६५ मोबाइल परराज्यात असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यापैकी ३९२ मोबाइल मध्य रेल्वेवरुन, तर ३७३ मोबाइल पश्चिम रेल्वेवरुन चोरीला गेले आहेत. आतापर्यंत ९७५ गुन्ह्यांची उकल झाली असून या गुन्ह्यात १ हजार १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *