गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने 80 हजाराची लाच घेताना पलूसमध्ये दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
समीर शमशुद्दीन मुल्ला, ( वय ४३, रा. स्काय लाईन बिल्डींग, इंगळेकर हॉस्पीटल जवळ, पलूस) याला ८० हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडले, यासाठी त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सचिन संपत औटे (वय ४० वर्षे, रा. कुंडल, ता. पलूस) यालाही अटक करण्यात आली आहे.
पलूस पोलीस ठाणे येथे फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले तक्रारदार यांचे भाऊ यांना गुन्ह्यात सहकार्य करणे करीता व त्यांचेवर आणखीन गुन्हे दाखल करु नये याकरीता मुल्ला यांने तक्रारदाराकडे एक लाख रूपयाची लाच मागणी केली होती. तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता मुल्ला यांने पोलीस अधीकारी यांना सांगुन मदत करतो असे म्हणुन १ लाख रुपये लाचेची मागणी करुन चर्चेअंती ८०,०००/- रूपये पोलीस अधीकारी यांचेकरीता लाचेची मागणी केली व लाच रक्कम घेवून येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी सायंकाळी पलूस येथील नवीन एस.टी. स्थानकाजवळ सापळा लावला असता मुल्ला यांने तक्रारदाराकडून ८० हजार रूपये लाच रक्कम स्विकारली असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या लौटे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघाविरुध्द पलूस पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
