कर्नाटकात हिजाबसाठी आंदोलन करणाऱ्या २३ विद्यार्थिनी निलंबित

कर्नाटकातील उप्पिनगडी शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने २३ विद्यार्थिनींना निलंबित केले. त्यांनी गेल्या आठवडय़ात वर्गात हिजाब परिधान करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भाजपचे पुत्तूरचे आमदार व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संजीव मातांदूर यांनी मंगळवारी सांगितले, की हिजाब परिधान करण्यासाठी विद्यार्थिनींनी निदर्शने केली. त्यामुळे सोमवारी त्यांना निलंबित करण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवडय़ात या विद्यार्थिनी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील महाविद्यालयात हिजाब घालून आल्या होत्या. वर्गात हिजाब घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत त्यांनी निदर्शने केली होती. समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत या विद्यार्थिनींना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. हिजाब घालून महाविद्यालयात आल्याने सात विद्यार्थिनींना समितीने याआधीच निलंबित केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *