कोल्हापूरमध्ये अज्ञाताने तीन दुचाकी पेटविल्या

खरी कॉर्नर, महाद्वार रोडवर मध्यरात्री अज्ञाताने तीन दुचाकी पेटविल्या, तर दोन दुकाने पेटविण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (ता. 3) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबतची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. वर्षापूर्वी सरस्वती चित्रपटगृहाजवळील काही वाहने अशाच पद्धतीने पेटविण्यात आली होती. त्याचा तपास अद्याप सुरू आहे.

खरी कॉर्नर येथील चौकात संजय उर्फ बंटी राऊत आणि अशोक राऊत यांचे घर आहे. त्यांच्या दारात नेहमी प्रमाणे मोपेड आणि मोटारसायकल उभी केली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास राऊत कुटुंबीयांना फटाक्‍यासारखा आवाज आला. धूरही आल्याचे त्यांना खिडकीतून दिसले. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर धाव घेतली. तेव्हा त्यांच्याच दोन दुचाकी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाणी मारून आग अटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान येथून शववाहिका चालली होती. शववाहिकेच्या चालकानेच तातडीने अग्नीशमन दलाशी संपर्क साधून बंब पाठविले. बंब आणि जवान याचबरोबर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत राऊत कुटुंबीयांनी आग आटोक्‍यात आणली होती. याच आगीच्या धगीने राऊत यांच्या घराशेजारी असलेल्या मोबाइल शॉपीच्या बाहेर लावलेले फलकही जळाले.

दरम्यान, बिनखांबी गणेश मंदिराजवळली महाद्वाररोडवरील “राजहंस‘ डिझायनर वेअर फॉर वूमन या दुकानाच्या शटरजवळही आग लागल्याचे दिसून आले. सकाळी कामगार दुकानात आल्यानंतर शोरूम ला लावलेले पाच ड्रेस जळाल्याचे दिसून आले. त्यांनी शटर उघडून सीसीटीव्हीद्वारे अधिक माहिती घेतली. तेव्हा साधारण 2 वाजून दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत एका अज्ञात व्यक्तीने शटर जवळील पायपोसण्यास आग लावल्याचे दिसून आले. हेच पायपोसणे शटरजवळच राहिल्यामुळे केवळ शोरुम ला असलेले पाच ड्रेस जळाले. आग तेथेच विझल्यामुळे मोठे नुकसान टळले. अन्यथा दुकानातील सर्व ड्रेस जळून खाक झाले असते. सतु सिंग यांच्या मालकीचे हे दुकान असून जुना राजवाडा पोलिसांनी तेथील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले आहे. तसेच हॉटेल कामत समोरील तृषाशांती कोल्ड्रिंक हाऊसच्या दारातच असलेली आदित्य शुक्‍ल यांची मोटारसायकलही पेटवली असल्याचे आज सकाळी उघडकीस आले. त्यांची मोटारसायकल पूर्ण जळून खाक झाली आहे. एकवर्षापूर्वी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि आज घडलेल्या ठिकाणी परिसरातीलच मोटार,दुचाकी जाळण्याची घटना झाली होती. त्याचा तपास अद्याप सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *