मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच सध्या राज्याच्या काही भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गुरुवारी (१९ मे) पाऊस झाला. पुढील एक ते दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. त्याचप्रमाणे देशातील पश्चिम-उत्तर, पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील तीनचार दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातून सध्या मोठय़ा प्रमाणावर वारे वाहत आहेत. त्याचप्रमाणे देशात अनेक भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात प्रामुख्याने बाष्पयुक्त वारे दाखल होत असल्याने या भागात पाऊस हजेरी लावतो आहे. गुरुवारी सोलापूर, सांगली, जालना, उस्मानाबाद. चंद्रपूर, यवतमाळसह दक्षिण कोकणात काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला.
