विमान जाणीवपूर्वक पाडले आणि १३२ जणांचा जीव घेतला; चीनमधील अपघातासंदर्भात मोठा खुलासा

चीनमध्ये मार्च महिन्यात एक मोठा विमान अपघात झाला होता. ईस्टर्न एअरलाइन्सचे विमान कोसळून झालेल्या या अपघातात १३२ जण ठार झाले होते. आता या अपघातासंदर्भात एक मोठा खुलासा झालाय.

एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, संबंधित विमान अखेरच्या क्षणी जाणीवपूर्वक वेगाने खाली आणले गेले. हा दावा विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या विश्लेषणानंतर अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी केलाय. संबंधित विमान कनमिंगहून ग्वांगझोउकडे जात होते. विमान वुझोउ येथे कोसळले. वॉल स्ट्रीट जनरलने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ब्लॉक बॉक्समधून मिळालेल्या माहितीनुसार कॉकपिटमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला इनपूट देण्यात आले होते आणि त्यामुळेच हा अपघात झाला. अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कॉकपिटमध्ये व्यक्तीला कोणी तरी सांगितल्याने हा अपघात झाला.

चायना ईस्टर्न फ्लाइट MU5735 ग्वांगझोउ पोहोचण्याच्या एक तास आधी कोसळले. या विमान अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला होता. बोइंग ७३७-८०० जेटच्या ट्रेकिंग सेवा फ्लाइटरडारमधील माहितीनुसार विमान कोसळण्याच्या आधी दोन मिनिटापेक्षा कमी काळात २९ हजार फुट खाली आले होते. याआधी २० एप्रिल रोजी चीन विमान प्राधिकरणाने एक प्राथमिक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. या रिपोर्टमध्ये विमानात कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता असे म्हटले होते. कोसळण्याच्या आधी विमान सामान्य होते.

वॉल स्ट्रीटने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार विमानातील एखादी व्यक्ती कॉकपिटमध्ये घुसली आणि तिने जाणीवपूर्वक अपघात घडवला असे होऊ शकते. विमान अपहरणाच्या अनेक प्रकरणात अपघात होण्याच्या घटना समोर येतात. अमेरिकेतील ९/११ दहशतवादी हल्ला हे त्याचे उदाहरण होय. १९९९ साली वैमानिकांनी जाणीवपूर्वक विमान क्रॅश केल्याच्या घटना घडल्या आहेत. १९९९मध्ये विमानाचा कॅप्टन आराम करण्यास गेला आणि त्यानंतर झालेल्या अपघातात २१७ जण ठार झाले होते. मार्च २०१५ मध्ये अशाच एका अपघातात १५० जण ठार झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *