मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीची धुरा एकहाती सांभाळणाऱ्या मुंबई लोकलमधील वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीचे तिकीट दर कमी झाल्यानंतर प्रवाशांनी गारेगार प्रवासाला आपलेसे केले आहे. रेल्वे मंत्रालयाने वातानुकूलित व प्रथम श्रेणीचे तिकीट दर कमी केल्यानंतर पहिल्याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ९,६५१ तिकिटांची विक्री झाली आहे. तर ११,९७८ प्रवाशांनी प्रवास केला. एरवी रिकाम्या धावणाऱ्या वातानुकूलित लोकल प्रवाशांनी भरून जात असल्याने रेल्वेच्या गारेगार, स्वस्त, वेगवान आणि आरामदायी प्रवासाला प्रवाशांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
‘सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर वातानुकूलित लोकलने प्रवास तासाभरात पूर्ण होतो, तोही १०५ रुपयांत. खड्डे, गतिरोधक यांमुळे बस, टॅक्सीऐवजी लोकलमध्ये बसून कार्यालयीन काम करणे खूपच सोयीचे झाले आहे. तिकीट दर कमी केल्याने रेल्वे प्रशासनाचे आभार’, अशी प्रतिक्रिया प्रवासी प्रतीक गोसावी यांनी दिली.
