स्पाईस जेट’च्या विमानात अपघात; खराब हवामानाचा फटका; १७ जण जखमी

मुंबईहून उड्डाण केलेल्या स्पाईस जेटच्या विमानाच्या आत दुर्गापूर विमानतळावर उतरताना खराब हवामानामुळे (टब्र्युलन्स) अपघात झाला. दुर्घटनेत विमानातील १४ प्रवासी आणि तीन विमान कर्मचारी असे १७ जण जखमी झाले. यापैकी तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य प्रवासी व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. या घटनेची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून चौकशीही करण्यात येणार आहे.

 ही घटना १ मे रोजी घडली. स्पाईस जेटचे ‘बोईंग बी ७३७’ विमानाने मुंबई विमानतळावरुन सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास दुर्गापूरसाठी उड्डाण केले. या विमानात १९५ प्रवासी होते. विमान उतरण्यापूर्वी वादळात सापडले. विमान उतरत असतानाच खराब हवामानामुळे त्याला बरेच धक्के बसत होते. त्यामुळे केबिनमध्ये ठेवलेले सामान प्रवाशांवर पडू लागले. यामुळे काही प्रवासी जखमी झाले. काहींना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. यावेळी प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानातील कर्मचारीही प्रवाशांना मदत करीत होते. परंतु खराब हवामानामुळे विमानाला लागत असलेले धक्के, इतस्तत: पडणारे सामान आणि जखमी प्रवासी यामुळे गोंधळाचे वातावरण होते. प्रवासी मदतीसाठी याचना करीत होते. काही वेळानंतर हे विमान तातडीने विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ प्रवाशांना वैद्यकीय मदत देण्यात आल्याचे स्पाईस जेटकडून सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या डोक्याला, पाठ, खांद्याला तसेच चेहऱ्याला इजा झाली आहे. तीन प्रवाशांवर उपचार सुरू असून यापैकी दोन प्रवाशांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. एकाच्या डोक्याला, तर दोन प्रवाशांच्या पाठिच्या कण्याला मार बसला आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या विमानाची पाहणी केली. यात विमानातील आसनेही तुटलेली होती, तर प्राणवायूचे मास्क व अन्य सामानही अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *